डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार व डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथमित्र पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

Team RatnagiriLive
1 Min Read


रत्नागिरी, दि.१९ (जिमाका) : राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांचा गुणात्मक विकास व्हावा, ग्रंथालयांकडून जनतेला अधिक चांगल्या ग्रंथालय सेवा उपलब्ध करुन द्याव्यात, वाचन संस्कृती वृध्दींगत करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने “डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार” तसेच, ग्रंथालय चळवळीतील कार्यकर्ते व सेवक यांना भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. शियाली रामामृत रंगनाथन यांच्या नावाने “डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक (ग्रंथमित्र) पुरस्कार” देण्यात येतो.

तरी सन २०२२-२३ च्या पुरस्कारासाठी इच्छुक असणारी ग्रंथालये, कार्यकर्ते व सेवक यांनी आपले विहित नमुन्यातील अर्ज 22 जानेवारी 2024 ते 9 फेब्रुवारी 2024 पर्यंत तीन प्रतीत आपल्या जिल्ह्यातील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाकडे सादर करावेत, असे आवाहन ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबईचे प्र.ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर यांनी केले आहे.

यामध्ये राज्यातील शहरी व ग्रामीण विभागातील [“अ” “ब” “क” “ड” वर्गातील उत्कृष्ट शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना अनुक्रमे 1 लाख रुपये, 75 हजार रुपये, 50 हजार रुपये, 25 हजार रुपये रोख रक्कम आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येते.

राज्यातील एक राज्यस्तरीय उत्कृष्ट कार्यकर्ता व एक राज्यस्तरीय उत्कृष्ट ग्रंथालय सेवक यांना प्रत्येकी रुपये 50 हजार रुपये रोख रक्कम आणि प्रमाणपत्र तसेच राज्यातील प्रत्येक महसुली विभागातील प्रत्येकी एक उत्कृष्ट कार्यकर्ता व उत्कृष्ट सेवक यांना प्रत्येकी 25 हजार रुपये रोख रक्कम आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येते.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment