Konkan Railway | गोवा वंदे भारत एक्सप्रेस ८ ऐवजी १६ डब्यांची करावी ; कोकण विकास समितीचे रेल्वे मंत्रालयाला निवेदन

Team RatnagiriLive
2 Min Read

मुंबई : मुंबई गोवा मार्गावर धावणारी वंदे भारत एक्सप्रेस शुभारंभापासूनच लोकप्रिय बनली आहे. गेल्या जून मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोवा वंदे भारत एक्सप्रेस ला हिरवा झेंडा दाखवल्यापासून आजपर्यंत तिला सरासरी जवळपास 95 टक्के भारमान मिळत आहे. या गाडीची लोकप्रियता लक्षात घेऊन ही गाडी आठ ऐवजी 16 डब्यांची करावी, अशा मागणीचे निवेदन कोकण विकास समितीने रेल्वे मंत्रालयासह मध्य रेल्वेला पाठवले आहे.

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते गोव्यातील मडगाव दरम्यान धावणारी (22229/22230) वंदे भारत एक्सप्रेस सुरुवातीपासूनच जवळपास हाउसफुल्ल धावत आहे. ही गाडी रेल्वेच्या तिजोरीत चांगलाच महसूल टाकताना दिसत आहे.

कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या या गाडीची लोकप्रियता लक्षात घेऊन मुंबई सीएसएमटी – मडगाव दरम्यान धावणाऱ्या या गाडीला 16 डब्यांचा रेक उपलब्ध करून चालवावी अशा मागणीचे निवेदन कोकण रेल्वे मार्गावरील प्रवासी सुविधांसाठी नेहमी आग्रही असलेल्या कोकण विकास समितीने रेल्वे मंत्रालयासह रेल्वेच्या सर्व संबंधित विभागांना पाठवले आहे.

सध्या ही गाडी आठ डब्यांचा चालवली जात असल्यामुळे या गाडीला सध्या मर्यादित सीट उपलब्धता दाखवत आहे. या बाबींचा विचार करता या गाडीची प्रवासी क्षमता वाढवण्यासाठी ही गाडी आठ ऐवजी 16 डब्यांची चालवावी, अशी आग्रही मागणी कोकण विकास समितीने केली आहे. समितीच्या श्री. जयवंत दरेकर यांनी हे निवेदन नुकतेच सर्व संबंधितांना पाठवले आहे.

गोवा वंदे भारत एक्सप्रेस या स्थानकांवर थांबते

आठवड्यातून सहा दिवस शुक्रवार वगळून चालवण्यात येणारी गोवा वंदे भारत एक्सप्रेस मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव दरम्यान दादर, ठाणे, पनवेल, खेड, रत्नागिरी, कणकवली तसेच थिवी हे थांबे घेते. सुरुवातीपासूनच वक्तशीरपणा तसेच आरामदायी प्रवास यामुळे ही गाडी प्रवासी तसेच पर्यटकांमध्ये अत्यंत पसंतीची गाडी ठरत आहे

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment