आश्वासन मिळाल्याने दिव्यांग बांधवांचे धरणे आंदोलन स्थगित

Team RatnagiriLive
2 Min Read

उरण (विठ्ठल ममताबादे ) : बोकडविरा ग्रामपंचायत हद्दीतील द्रोणागिरी नोडमध्ये साफसफाई कामगार भरतीमध्ये दिव्यांगांना प्राधान्य मिळावे तसेच गावातील कमिटीमध्ये गावातील किमान एक दिव्यांग बांधवांचा समावेश करून घ्यावे, या प्रमुख मागणीसाठी गावातील दिव्यांग बांधव हे मंगळवार दि. २५ मार्च २०२५ रोजी बोकडविरा ग्रामपंचायत येथे सकाळी १० वाजता धरणे आंदोलनाला बसणार होते. मात्र, धरणे आंदोलनाला बसण्यापूर्वीच बोकडविरा ग्रामपंचायतीचे सरपंच  अपर्णा पाटील, उपसरपंच ध्रुव पाटील, ग्रामसेवक घाडगे, कॉम्रेड भूषण पाटील, सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र म्हात्रे,यशवंत ठाकूर,महिला सामाजिक कार्यकर्त्या हेमलता पाटील, दिव्यांग संघटनेचे पदाधिकारी समीर ठाकूर, रणिता ठाकूर, उमेश पाटील, राजेंद्र पाटील यांच्यात महत्वाची बैठक ग्रामपंचायत बोकडविरा येथे संपन्न झाली

बोकडविरा ग्रामपंचायत मध्ये सर्व ग्रामस्थांना सर्वच मूलभूत सेवा सुविधा मिळाव्यात यासाठी ग्रामपंचायत प्रयत्नशील आहे.शासनाच्या सर्वच योजना तळागाळात राबविले जातात. गावात कोणत्याही व्यक्तीवर अन्याय केले जात नाही. दिव्यांग बांधव असो किंवा दुसरे कोणीही असो कोणावरही अन्याय केले जात नाही. सर्व समाज घटकांना घेऊन ग्रामपंचायत विकासाकडे वाटचाल करत आहे. दिव्यांग बांधवांना संपर्क करून त्यांच्या समस्या समजून घेतल्या. त्यांच्या  समस्या सोडविण्यासाठी ग्रामपंचायत नेहमी सकारात्मक आहे. त्यांच्या समस्या प्राधान्याने सोडविण्यात येईल.

अपर्णा पाटील, सरपंच, ग्रामपंचायत बोकडविरा

दिव्यांग बांधवाचे प्रतिनिधी म्हणून दिव्यांग सामाजिक संस्थेचे अध्यक्ष महेंद्र नामदेव म्हात्रे (बोकडवीरा )यांनी नेतृत्व केले.या बैठकीत दिव्यांग बांधवांच्या महत्वाच्या मागण्यावर  सकारात्मक चर्चा झाली. सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक व ग्रामपंचायत सदस्यांनी दिव्यांग बांधवाना त्यांचे मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. आश्वासन मिळाल्याने दिव्यांग बांधवांनी समाधान, आनंद व्यक्त करत जाहीर केलेले आमरण उपोषण स्थगित केले.

मागण्या मान्य केल्याने सर्व दिव्यांग बांधवांनी सरपंच,उपसरपंच, ग्रामसेवक व ग्रामपंचायतच्या सर्व सदस्यांचे व उपस्थित सर्व मान्यवरांचे जाहीर आभार मानले आहेत.

 

Loading

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment