महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सराजकीयलोकल न्यूज

रत्नागिरीत पालकमंत्र्यांच्या हस्ते पत्रकार भवनाचे भूमिपपूजन

  • स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रासाठी आवश्यक तो निधी दिला जाईल : पालकमंत्री डाॕ उदय सामं

रत्नागिरी, दि. 22  : पत्रकार भवनमध्ये ग्रंथालय, अभ्यासिका आणि निवासाची सोय असणार आहे. याठिकाणी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरु करुन माध्यमातून पत्रकार देखील आयएएस, आयपीएस निर्माण करु शकतात, हा संदेश महाराष्ट्रभर द्यावा. त्यासाठी आवश्यक तो निधी दिला जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिली.


मिरजोळे एमआयडीसी येथे बांधण्यात येणाऱ्या पत्रकार भवन इमारतीचे भूमिपूजन कोनशिलेचे अनावरण करुन आणि कुदळ मारुन पालकमंत्री डॉ. सामंत यांच्या हस्ते आज झाले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते, प्रांताधिकारी जीवन देसाई, एम आय डी सीच्या प्रादेशिक अधिकारी वंदना खरमाळे, ज्येष्ठ पत्रकार अरविंद कोकजे, प्रमोद कोनकर , अलिमियाँ काझी, किशोर मोरे, हेमंत वणजू, आनंद तापेकर, राजेश शेळके, मेहरुन नाकाडे, जान्हवी पाटील, उज्ज्वला पंगेरकर, राजेंद्र चव्हाण, राकेश गुडेकर, मनोज लेले, अमोल मोरे, आदी पत्रकार उपस्थित होते.


पालकमंत्री डॉ. सामंत मार्गदर्शन करताना म्हणाले, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री असताना एलफिन्स्टन कॉलेजला आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे तैलचित्र 15 दिवसात लावले. मराठी बरोबरच हिंदी पत्रकारतेची सुरुवात देखील कोकणातून झालेली आहे. मला मनापासून समाधान आहे की जे स्वप्न पत्रकारांसाठी बघितले ते पूर्ण करण्याची संधी माझ्या सारख्या कार्यकर्त्याला मिळाली. त्याला जमीनदेखील देण्याची संधी मिळाली. 1 कोटी 36 लाख रुपये खर्च करुन ही इमारत आपण उभी करत आहोत. यामध्ये अभ्यासिका, ग्रंथालय, निवासी सोय, सभागृह आहे. या पत्रकार भवनमधून आयएएस, आयपीएस अधिकारी घडविण्यासाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरु करावे, त्यासाठी आवश्यक तो निधी दिला जाईल.
वर्तमानपत्रावर सोशल मीडियाचे आज आक्रमण आले आहे. या सोशल मीडियाच्या माध्यामातून नवे लेखन निर्माण झाले. त्याच्या आक्रमणामुळे आत्मचिंतन करण्याची वेळ सर्वांवर आली आहे. याला आचारसंहिता कुठेतरी घालून घ्यायची आवश्यकता आहे. दिल्लीची पत्रकारिता, मुंबईची पत्रकारिता आणि रत्नागिरीची पत्रकारिता याचा देखील अभ्यास करता यावा म्हणून गेली 2 वर्षे रत्नागिरीमध्ये पत्रकारांची कार्यशाळा घेतली जाते. या पत्रकार भवनाचा वापर करत असताना बाकीच्या जिल्ह्यामध्ये, बाकीच्या शहरामध्ये, बाकीच्या राज्यांमध्ये आदर्श निर्माण होईल असे कामकाज व्हायला हवे.
रत्नागिरीमध्ये असणाऱ्या प्राईम लोकेशनवरील पत्रकार भवनच्या जागेचा प्रश्न ज्येष्ठ पत्रकारांनी एकत्र येऊन सोडविल्यास, त्या जागेसाठीही 5 कोटी रुपये दिले जातील. त्याठिकाणीही राज्यातील एक अद्ययावत पत्रकार भवन उभे केले जाईल, असे सांगून पालकमंत्री म्हणाले, पत्रकारांच्या मुलांना स्पर्धा परीक्षेसाठी निवासी राहून अभ्यास करण्यासाठी या पत्रकार भवनाचा निश्चित उपयोग होईल. एक वर्षाच्या आत हे पत्रकार भवन पूर्ण होईल, असेही ते म्हणाले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास तसेच आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. दीपप्रज्ज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाचे स्वागत एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकारी श्रीमती खरमाळे यांनी केले. प्रस्ताविक जिल्हा माहिती अधिकारी श्री. सातपुते यांनी केले. ज्येष्ठ पत्रकार सतीश कामत यांनी पत्रकारांच्यावतीने आपले मनोगत व्यक्त केले. अलिमियाँ काझी यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिजीत गोडबोले यांनी केले.

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button