- कोकणच्या वाट्याला फक्त महागडा प्रवासच का?
रत्नागिरी : सामान्य माणसाला परवडणारी, विना-वातानुकूलित पण आधुनिक सुविधा असलेली ‘अमृत भारत एक्सप्रेस’ प्रामुख्याने यूपी-बिहारसाठीच आहे का? कोकण रेल्वेवर प्रवाशांच्या खिशावर ‘डल्ला’ मारणाऱ्याच गाड्या का धावतात, असा सवाल आता सामान्य प्रवासी करू लागले आहेत.
रेल्वेच्या विकासाचा अभिमान नक्कीच आहे, पण हा विकास सर्वसमावेशक आहे का?
✅ देशातील पहिली तेजस एक्सप्रेस: मुंबई-गोवा मार्गावर धावली. हिचे तिकीट दर सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावणारे असले तरीही गाडी रेल्वेच्या तिजोरीत भर टाकत आहे. मात्र सामान्यांना परवडेल अशी अमृत भारत एक्सप्रेस कोकण रेल्वे मार्गावर सुरू करण्यासंदर्भात रेल्वेला अजूनही रस दिसत नाही.
✅ विस्टाडोम कोच: पर्यटनपूरक असे विस्टा डोम कोच पहिल्यांदा मुंबई-गोवा मार्गावर आले. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव दरम्यान धावणाऱ्या तेजस एक्सप्रेसला हे कोच जोडण्यात आले आहेत.
पर्यटनासाठी उत्तम, पण रोजच्या प्रवाशांचे काय?
आता प्रश्न असा आहे: सामान्य माणसाला परवडणारी, विना-वातानुकूलित पण आधुनिक सुविधा असलेली ‘अमृत भारत एक्सप्रेस’ प्रामुख्याने यूपी-बिहारसाठीच का? कोकण रेल्वेवर प्रवाशांच्या खिशावर ‘डल्ला’ मारणाऱ्याच गाड्या का धावतात?
देशाच्या कानाकोपऱ्यात जाणाऱ्या गाडीला ‘अमृत भारत’ म्हणता, मग महाराष्ट्रातील आणि कोकणातील सामान्य चाकरमान्याला या सुविधेपासून वंचित का ठेवले जात आहे, असा सवाल उपस्थित झाला आहे.
सर्वसामान्य प्रवाशांची मागणी : आम्हाला फक्त लक्झरी नको, तर सामान्यांना परवडणारा ‘अमृत’ प्रवासही हवा आहे, अशी मागणी कोकण रेल्वे मार्गावर प्रवास करणारे सामान्य प्रवासी करीत आहेत.
