पाऊस-वादळी वाऱ्यामुळे खंडित झालेला वीजपुरवठा तरुणांच्या श्रमदानातून सुरळीत

Team RatnagiriLive
1 Min Read

दापोली : मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे दापोली तालुक्यातील पवई पंचक्रोशीतील 11 के. व्ही. च्या वीजवाहिनीवर मोठ्या प्रमाणात झाडे व फांद्या कोसळल्याने सलग चार दिवस वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत होता.
अखेर परिसरातील तरुणांनी पुढाकार घेत बुधवारी सायंकाळपासून आज दिवसभर श्रमदानातून वीजवाहिनीवरील झाडी हटवून दोष दूर करण्याचे काम हाती घेतले. आडे हायस्कूल येथील 11के. व्ही. च्या मुख्य वीजवाहिनीपासून कामाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर आडे शिवाजीनगर एबी स्विच, लोणवडी लाईन, माळवी एबी स्विच, इळणे लाईन तसेच बोरथळ, वाघिवणे एबी स्विचपर्यंत संपूर्ण वीजवाहिनीवरील झाडी हटविण्यात आली. या प्रयत्नांमुळे परिसरातील वीजपुरवठा पुन्हा सुरळीत झाला.

या श्रमदान मोहिमेत पंचक्रोशीतील रोशन धाडवे, सागर धाडवे, विनोद कुळे, मंगेश पवार, सतीश धावरे, शाम रहाटवळ, केदार लिमये, आश्विन वडतकर, अतुल रांगळे, रंजन साळवी, कमलाकर काताळकर, रोहन गोयथळे तसेच इळणे गावातील ग्रामस्थांनी सक्रिय सहभाग घेतला. याशिवाय अमोल कोळंबेकर, तुषार रांगळे तसेच वायरमन रोहित आग्रे आणि आश्विन राठोड यांनीही मोलाचे सहकार्य केले.

स्थानिक तरुणांच्या एकजुटी आणि श्रमदानामुळे अनेक दिवसांपासून खंडित झालेला वीजपुरवठा पुन्हा सुरळीत झाला. या कामामुळे पवई पंचक्रोशीतील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, सर्व सहभागींचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment