महाराष्ट्र

खासदार गिरीश बापट यांच्या निधनाने भाजपचा पुण्याचा चेहरा काळाच्या पडद्याआड

पुणे : “राज्याचे माजी मंत्री, विद्यमान खासदार गिरीश बापट यांचे पुणे येथे निधन झाले. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचाराधी नसताना गिरीश बापट यांनी 72 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने राजकारणातील सुसंस्कृत चेहरा हरपल्याच्या भावना व्यक्त होत आहेत. गिरीश बापट यांच्या निधनामुळे भारतीय जनता पार्टीचा पुण्याचा चेहरा हरपला आहे.

बापट त्यांच्या निधनाची बातमी समजताच राज्याचे माजी मुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, खासदार गिरीश बापट यांचे निधन निधन हे पुणे जिल्ह्यातल्या आम्हा सर्वपक्षीय राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांसाठी मोठा धक्का आहे. महाराष्ट्राचं सर्वसमावेशक, सुसंस्कृत राजकारणाचा चेहरा म्हणून गिरीशभाऊंकडे पाह्यलं जायचं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत तयार झालेल्या गिरीशभाऊंनी जात, धर्म, पंथ, प्रांत, भाषा, पक्षभेदांच्या भिंती ओलांडून समाजकार्य, विकासाचं राजकारण केलं. टेल्को कंपनीतल्या कामगारनेत्यापासून सुरु झालेला त्यांचा प्रवास पुणे महापालिकेचे नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, आमदार, मंत्री, खासदार पदापर्यंत पोहचला. चार दशकांच्या प्रदीर्घ राजकीय वाटचालीत गिरीशभाऊंना पुणेकरांचं अलोट प्रेम मिळालं. 1995 पासून 2014 पर्यंत सलग पाच वेळा ते आमदार झाले. 2019 ला खासदार झाले. राज्याचे मंत्री, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून पुणे शहर, जिल्ह्याच्या विकासातलं त्यांच योगदान कायम स्मरणात राहील.

काही महिन्यांपासून त्यांची प्रकृती ठिक नव्हती. आजाराशी ते निर्धारनं लढत होतं. बरे होऊन सार्वजनिक जीवनात ते पुन्हा सक्रीय होतील, हा विश्वास आम्हा सगळ्यांना होता. तो विश्वास खोटा ठरला. गिरीशभाऊंच्या निधनानं पुणे जिल्ह्याचं सर्वसमावेशक नेतृत्वं हरपलं आहे. आम्ही ज्येष्ठ सहकारी, सुहृदय मित्र गमावला आहे. पुणे जिल्ह्याला, राज्याला गिरीशभाऊंची उणीव कायम जाणवेल, त्यांची आठवण कायम येत राहील. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. गिरीशभाऊंच्या कुटुंबियांच्या, कार्यकर्त्यांबद्दल सहसंवेदना व्यक्त करतो,” अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी खासदार गिरीश बापट यांच्या निधनाबद्दल तीव्र दु:ख व्यक्त करुन श्रद्धांजली वाहिली.

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button