युवा संदेश प्रतिष्ठानचे आदर्श शिक्षक पुरस्कार राजेंद्र वारे व महेश नवेले यांना जाहीर

Team RatnagiriLive
2 Min Read

उद्या १४ जुलै रोजी रत्नागिरी येथे होणार वितरण

रत्नागिरी : युवा संदेश प्रतिष्ठान यांच्यावतीने चालू वर्षापासून शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या रत्नागिरी जिल्ह्यातील उपक्रमशील शिक्षकांना ‘युवा संदेश आदर्श शिक्षक पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात येणार आहे. हा पुरस्कार रत्नागिरी जिल्हा मर्यादित असून युवा संदेश प्रतिष्ठानच्या तज्ञ कमिटी मार्फत कोणत्याही प्रकारचा प्रस्ताव न मागवता शालेय विद्यार्थी, पालक, शालेय परिसरातील ग्रामस्थ, सहकारी यांच्याशी चर्चा करून आदर्श शिक्षकांची निवड करण्यात आली आहे.

सन २०२४ या वर्षांसाठी आदर्श शिक्षक पुरस्कार निवड घोषित करण्यात आली आहे. यामध्ये माध्यमिक विभागातून गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सावर्डे, तालुका चिपळूण जि.रत्नागिरीचे मुख्याध्यापक राजेंद्र हरिश्चंद्र वारे आणि प्राथमिक विभागातून जि.प.पूर्ण प्राथमिक शाळा रनपार, ता.रत्नागिरीचे उपशिक्षक महेश विश्राम नवेले यांची निवड करण्यात आली आहे.

निवड झालेल्या शिक्षकांना रविवार १४ जुलै २०२४ रोजी माध्यमिक शिक्षक पतपेढी रत्नागिरी येथे होणार्‍या सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षा बक्षिस वितरण कार्यक्रमात मान्यवरांच्या शुभ हस्ते गौरविण्यात येणार आहे.*

युवा संदेश आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण करण्याचे रत्नागिरी जिल्ह्यातील हे पहिले वर्ष असून शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कारमूर्तींचे युवा संदेश प्रतिष्ठान संस्थापक संदेश उर्फ गोट्या सावंत व युवा संदेश प्रतिष्ठान अध्यक्षा व सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.संजना संदेश सावंत यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Loading

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment