कंत्राटी वीज कामगार २४ ऑगस्टला ऊर्जामंत्र्यांच्या नागपुरातील निवासस्थानावर काढणार मोर्चा

Team RatnagiriLive
2 Min Read
  • व्यवस्थापनाच्या आडमुठेपणामुळे कंत्राटी कामगारांची मिटींग निष्फळ

उरण दि २१ (विठ्ठल ममताबादे ) : भारतीय मजदूर संघाशी संलग्न महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाच्या वतीने वेतन वाढ व हरियाना सरकार प्रमाणे वीज उद्योगात कंत्राटदार विरहित शाश्वत रोजगार मिळावा या व अन्य प्रमुख मागण्यासाठी राज्यभर साखळी उपोषण व २० ऑगस्ट २०२४ रोजी सर्व मंत्री महोदयांच्या घरासमोर जोरदार निदर्शने झाली. याच बरोबर दि. 24 ऑगस्ट रोजी कंत्राटी वीज कामगार ऊर्जामंत्र्यांच्या नागपुरातील निवासस्थानावर मोर्चा नेणार आहेत.

२४ ऑगस्ट रोजी निर्धारित रेशीमबाग ते ऊर्जामंत्री निवास मोर्चा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या अप्पर मुख्य सचिव ऊर्जा आभा शुक्ला यांनी तिन्ही वीज कंपन्यांचे व्यवस्थापकीय संचालकांसोबत महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाच्या प्रतिनिधीची मंगळवार दि. २० ऑगस्ट रोजी मंत्रालयात बैठक आयोजित केली होती.

मात्र या बैठकीत ठोस असे आश्वासन न मिळाल्याने कामगार आंदोलनावर ठाम आहेत. दर वेळी आश्वासन दिले जाते त्याचे पालन होत नसल्याने आता ठोस लिखित आश्वासन द्यावे यासाठी शनिवार दि.२४ ऑगस्ट २०२४ रोजी नागपुरातील रेशीमबाग मैदान ते ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी पायी मोर्चा काढून तेथे मागण्या मान्य होईपर्यंत आमरण उपोषण करण्याचा निर्धार राज्यातील सर्व वीज कंत्राटी कामगारांनी केला आहे.

या आंदोलनात राज्यातील सर्व वीज कंत्राटी कामगारांनी २४ तारखेला नागपूरला यावे असे आवाहन महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघांचे अध्यक्ष निलेश खरात व सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी केले आहे.

या बैठकीला भारतीय मजदूर संघाचे प्रदेश अध्यक्ष अनिल ढुमणे, वीज कंत्राटी कामगार संघाचे अध्यक्ष निलेश खरात, सरचिटणीस, सचिन मेंगाळे, कार्याध्यक्ष अमर लोहार, उपाध्यक्ष मोहन देशमुख उपस्थित होते.

Loading

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment