उरण (विठ्ठल ममताबादे ) : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे कट्टर एकनिष्ठ प्रामाणिक कार्यकर्ते रविंद्र हरिश्चंद्र चव्हाण (महाड ) यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या रायगड जिल्हाध्यक्षपदी एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
रविंद्र चव्हाण यांनी पक्षासाठी आजपर्यंत दिलेले योगदान, पक्षाचे तळागाळात प्रचार प्रसार करणे, संघटनात्मक मोट बांधणे, पक्षाचे ध्येयधोरणे जनते पर्यंत पोहोचविणे आदी कार्याचा विचार करून रविंद्र चव्हाण यांची रायगड जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मुंबई येथील महाराष्ट्र प्रदेश कार्यालयात सदर नियुक्तीचा कार्यक्रम संपन्न झाला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष पद्मविभूषण खा. शरदचंद्रजी पवार आणि संसदरत्न खा. सौ. सुप्रिया सुळे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच कोकण विभागीय अध्यक्ष मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या रायगड जिल्हा अध्यक्ष पदी रविंद्र चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस संतोष घरत, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आदिती ताई नलावडे व रायगड जिल्हय़ातील सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नियुक्तीपत्र देऊन रविंद्र चव्हाण यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
