वेदमूर्ती दिनकरशास्त्री फडके यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी चिपळूणमध्ये शनिवारी सभा

Team RatnagiriLive
2 Min Read

चिपळूण : वेदमूर्ती दिनकरशास्त्री फडके यांचे १७ मे २०२५ रोजी निधन झाले. गेली अनेक वर्षे ते चिपळूणमध्ये पौरोहित्य क्षेत्रात कार्यरत होते आणि वेदशास्त्रांचे शिक्षण देऊन त्यांनी अनेक विद्यार्थीही घडवले. दिवंगत फडकेशास्त्रींना श्रद्धांजली वाहण्यासाठी शनिवारी, ७ जून २०२५ रोजी सायंकाळी सहा वाजता चिपळूणमध्ये श्रद्धांजली सभा होणार आहे.

वेदमूर्ती दिनकरशास्त्री फडके विद्यार्थी मंडळ आणि चिपळूणचा ब्राह्मण सहायक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने या श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे. चिपळूण मध्यवर्ती एसटी स्टँडच्या मागे असलेल्या ब्राह्मण सहायक संघातच ही सभा होणार आहे. सभेत मोजक्या शब्दांमध्ये मनोगत व्यक्त करता येईल, असे आयोजकांनी कळवले असून, या सभेला वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

अल्प परिचय
वेदमूर्ती दिनकरशास्त्री फडके यांचा जन्म १९ जुलै १९४४ रोजी रत्नागिरी तालुक्यातील पावसजवळच्या कुर्धे या गावी झाला. प्रसिद्ध वेदमूर्ती जनार्दन नारायण फडके यांचे ते ज्येष्ठ सुपुत्र. लहानपणापासूनच त्यांनी वडिलांकडून वेदशास्त्रांचे शिक्षण घेतले आणि त्यात पारंगत झाले. घरी काही काळ त्यांनी रेशन दुकानही चालवले. पुढे साधारण वयाच्या तिशीत ते काही उद्योग-व्यवसाय करण्याच्या उद्देशाने घराबाहेर पडले. मग ते चिपळूणमध्ये स्थायिक झाले. तिथे सुरुवातीला त्यांनी कंत्राटे घेऊन रस्त्यांची, तसेच अन्य कामे करण्याचा व्यवसाय केला. त्यानंतर अनेक वर्षे हॉटेल व्यवसायही केला.

वेदशास्त्रांचे धडे लहानपणीच गिरवलेले असल्याने नंतर ते पुन्हा पौरोहित्याकडे वळले. करारी स्वभाव, तसेच शिस्तबद्ध आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने सारी कामे करणे ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये. त्यामुळे या क्षेत्रात त्यांचे मोठे नाव झाले. आपले उद्योग-व्यवसाय सांभाळतानाच त्यांनी काही ज्येष्ठ व्यक्तींना पौरोहित्याचे धडे द्यायला सुरुवात केली होती. नंतर गेली काही वर्षे त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना वेदशास्त्रांचे धडे दिले. अशा रीतीने त्यांनी आपल्या वडिलांचा केवळ पौरोहित्याचाच नव्हे, तर वेदशास्त्रसंपन्न विद्यार्थी घडवण्याचा वारसाही समर्थपणे चालवला. अगदी अखेरपर्यंत ते कार्यरत होते. अमेरिकेत वास्तव्याला असलेली त्यांची कन्या परतल्यावर १९ मे रोजी त्यांच्या पार्थिवावर कुर्धे गावी अंत्यसंस्कार करण्यात आले.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment