आरवलीतील ब्रिटिशकालीन गरम पाण्याच्या कुंडांना महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाचा फटका

Team RatnagiriLive
2 Min Read

आरवली : संगमेश्वर तालुक्यातील आरवली येथील ब्रिटिशकालीन गरम पाण्याच्या कुंडांना मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाचा मोठा फटका बसला आहे. शासनाचा ‘क’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा मिळालेली ही कुंडे महामार्ग ठेकेदार कंपनीच्या नियोजनशून्य कामामुळे  चिखल-मातीचे पाणी शिरून खराब झाली आहेत. ‘परक्या ब्रिटिशांनी महामार्ग बांधताना सापडलेल्या या झऱ्यांचे जे जतन केले, ते आपल्यांनी नासवले’ अशी स्थिती निर्माण झाली आहे.

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामामुळे चिपळूण संगमेश्वर तालुक्यांच्या हद्दीवर आरवली येथे असलेली गरम पाण्याची कुंडे ही ब्रिटिश काळापासून जपलेली कुंडे आहेत. वीस वर्षापूर्वी शासनाने या ठिकाणचे महत्त्व लक्षात घेऊन आरवली येथील या गरम पाण्याच्या कुंडांचा ‘क’ वर्ग पर्यटन स्थळात समावेश केला. त्या अंतर्गत मिळालेल्या निधीतून साधारणपणे दोन दशकांपूर्वी कुंड परिसराचे सुशोभीकरण करण्यात आले.

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरून जाणारे पर्यटक, शालेय तसेच महाविद्यालयीन  विद्यार्थ्यांच्या सहली यांच्यासाठी हे एक पर्यटनस्थळ ठरले आहे. आरवली येथील गरम पाण्याच्या कुंडांमधील सल्फरयुक्त पाणी मागील अनेक पिढ्यांपासून त्वचेवरील विविध आजार निर्मूलनासाठी गुणकारी ठरले आहे.

मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामात ही दोन्ही कुंडे महामार्गाच्या दोन लेनच्या मध्ये ठेवून चौपदरीकरणाचे बांधकाम करण्यात आले आहे. मात्र, हे करताना ब्रिटिशांनी तीर्थाप्रमाणे जपलेली ही कुंडे सध्याच्या महामार्ग ठेकेदार कंपनीने अक्षरशः नासवली आहेत. वास्तविक या ठिकाणाचे महत्त्व लक्षात घेता स्थानिक लोकप्रतिनिधीनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन महामार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीच्या अभियंत्यांना काही सूचना करणे अपेक्षित होते. मात्र त्यातले काहीही न झाल्यामुळे आज शेकडो वर्षे जपलेल्या गरम पाण्याच्या कुंडांची अक्षरशः वाट लागली आहे.

Loading

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment