रत्नागिरी येथे दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना मोफत साहित्य वाटप

Team RatnagiriLive
1 Min Read

रत्नागिरी : रत्नागिरी येथे सामाजिक न्याय अधिकारिता व दिव्यांगजन सक्षक्तीकरण विभाग, भारत सरकार, सामाजिक न्याय विभाग, भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन विभाग यांच्यावतीने आज पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनासाठी आवश्यक साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले.

यावेळी दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी असणाऱ्या योजना, ज्येष्ठ नागरिकांची वैयक्तिक योजना असेल, तीर्थ दर्शन योजना असेल अशा सगळ्या योजनांचा लाभ महाराष्ट्र सरकार तुमच्यापर्यंत पोहोचवताना त्याच्यामध्ये मध्यस्थीची भूमिका अतिशय प्रामाणिकपणानं समाज कल्याणचे अधिकारी करताहेत. धडधाकट लोकांना लाजवेल, असा संदेश तुम्ही आम्हाला देत आहात. आयुष्य अडचणीचे असताना त्यावर मात करण्याचा धडा तुम्ही नेहमी देत असता. सगळ्या अडचणींवर मात करुन संदेश देणारा हा कार्यक्रम असल्याचे ना. सामंत यांनी सांगितले.

प्रत्येकाला समाजाला काहीतरी देणं लागतं, ही भूमिका डोळ्यासमोर ठेवून असे कार्यक्रम करण्यात येत आहेत. जीवनामध्ये पुढचे आयुष्य सुखी समाधानी करण्यासाठी एक विलक्षण प्रेरणा आम्हाला मिळाली. अद्भुतपूर्व आनंद तुमच्या चेहऱ्यावर सगळ्यांना बघायला मिळतोय. याचे वेगळे समाधान आज आहे, असेही यानिमित्ताने सांगितले.

यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त दीपक घाटे, प्रांताधिकारी जीवन देसाई, तालुका प्रमुख बाबू म्हाप यांसह मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव तसेच नागरिक उपस्थित होते.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment