पश्चिम बंगालमधील ममतांची ‘दिदीगिरी’ अखेर संपुष्टात 

Team RatnagiriLive
3 Min Read
  • भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांची प्रतिक्रिया

मुंबई  : पाचपैकी तीन राज्यांत भाजपा आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीला स्पष्ट बहुमत मिळाल्याने विरोधकांचा खोटा प्रचार पार उघडा पडला आहे. पश्चिम बंगालमध्ये तर ममता बॅनर्जी यांनी गेली पंधरा वर्षे केलेल्या चिखलात आता भाजपाचे कमळ फुलले आहे आणि त्यांची ”दिदीगिरी” संपुष्टात आली आहे. त्यांची सत्ता खालसा करण्याचे काम तेथील मतदार, भाजपा कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी केल्याची प्रतिक्रिया भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी सोमवारी व्यक्त केली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत श्री. बन बोलत होते.

पश्चिम बंगालमध्ये मागील निवडणुकीत 77 जागा जिंकल्यानंतरही तेथील कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम भाजपाने केल्याचे सांगत श्री. बन म्हणाले, या काळात ममता बॅनर्जींच्या कार्यकर्त्यांनी भाजपा कार्यकर्त्यांचा अतोनात छळ केला. मोठ्या प्रमाणात गुंडांकरवी सत्ता चालवण्याचे काम ममता बॅनर्जीनी केले. आम्ही त्या 77 आमदारांना बळ दिले. निवडणुक काळात स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी तिथे प्रचाराला उतरले. अमित शाह सुमारे वीस – बावीस दिवस पश्चिम बंगालमध्ये ठाण मांडून होते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी पदभार घेतल्यानंतरची ही पहिली निवडणूक होती. भाजपा कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभा राहणारा पक्ष आहे. संजय राऊत किंवा उद्धवजी ठाकरेंसारखे ‘तुम्ही लढा आम्ही कपडे सांभाळतो’ हे भाजपाचे धोरण नाही. आम्ही कार्यकर्त्यांच्या खांद्याला खांदा लावून मैदानात उतरतो, लढतो आणि जिंकतो. जनतेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा आशीर्वाद दिलेत. आता पश्चिम बंगालमध्ये आम्ही सरकार स्थापन करू आणि जनतेची सेवा करू.

संजय राऊत अजूनही भाजपाने निमलष्करी दल तैनात करून एसआयआर करत विजय मिळवल्याची कुरकुर करत आहेत. हाच न्याय लावायचा तर केरळमध्ये डाव्यांची सत्ता जात काँग्रेस सत्तेमध्ये येताना दिसते. त्याबद्दल संजय राऊत चकार शब्दाने बोलायला तयार नाहीत. ममता बॅनर्जी आजवर बोगस मतांच्या आधारावर निवडणूक जिंकत होत्या. हे बोगस मतदार बाजूला करण्याचे काम केले तेव्हा भाजपाचे सरकार आले. आजपर्यंत ममतांचा विजय हा बांगलादेशी घुसखोरांच्या जीवावर होत होता. केरळमध्ये झाले की योग्य आणि पश्चिम बंगालमध्ये झाले की अयोग्य, हे धंदे बंद करा, अशा शब्दात श्री. बन यांनी सुनावले. आसाममध्ये काँग्रेसने सातत्याने खोटे आरोप करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तेथे हिमंत बिश्व शर्मा यांच्या नेतृत्वात पुन्हा एकदा भाजपाची फक्त सत्ताच येत नाही तर तिथे डिस्टिंक्शनमध्ये भाजपाला विजय मिळाल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.

संजय राऊत, निवडणूक आयोग कुठल्याही राजकीय पक्षाचा मित्र पक्ष नसतो. निवडणूक आयोगाने त्याची भूमिका चोखपणे बजावली आहे. निवडणूक आयोग भाजपाचा मित्र पक्ष आहे का नाही हे सोडा. तुम्ही तर ममता बॅनर्जीचे मित्र होता. तुम्ही आणि उद्धवजी ठाकरे पश्चिम बंगालमध्ये प्रचारासाठी का गेला नाहीत?, असा सवाल श्री. बन यांनी उपस्थित केला.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment