करंजा बंदराचा लवकरच विकास; १३६.७६ कोटींचा निधी मंजूर

Team RatnagiriLive
2 Min Read
  • मंत्री नितेश राणे यांच्या पाठपुराव्याला यश; नोव्हेंबरपासून विविध विकासकामांना सुरुवात

उरण : मत्स्यव्यवसाय तथा बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे उरणमधील करंजा मच्छीमार बंदराच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. मत्स्यव्यवसाय विभागाने करंजा बंदरातील विविध २१ विकासकामांसाठी तब्बल १३६ कोटी ७६ लाख रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. येत्या नोव्हेंबर महिन्यापासून या कामांना सुरुवात होणार असून, गेल्या दोन वर्षांपासून गाळाच्या समस्येमुळे त्रस्त असलेल्या हजारो मच्छीमारांना मोठा दिलासा मिळणार आहे.

करंजा मच्छीमार बंदरातून मासेमारीच्या हंगामात सुमारे ५५० कोटी रुपयांच्या मासळीची उलाढाल होते. मात्र मागील दोन वर्षांपासून बंदराच्या प्रवेश मार्गावर मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने मच्छीमारांच्या अडचणी वाढल्या आहेत. ओहोटीच्या वेळी गाळामुळे बोटींची ये-जा ठप्प होते. मासळी उतरवल्यानंतर पुन्हा समुद्रात जाण्यासाठी मच्छीमारांना चार ते सहा तास बंदरातच थांबावे लागते. अनेकदा शेकडो बोटी गाळात अडकून पडतात.

या पार्श्वभूमीवर करंजा मच्छीमार संस्था आणि मच्छीमारांकडून सातत्याने बंदरातील गाळ काढण्याची मागणी करण्यात येत होती. याची दखल मंत्री नितेश राणे यांनी घेत, मत्स्यव्यवसाय विभागाच्या माध्यमातून बंदराच्या विकासासाठी विविध २१ कामांना मंजुरी दिली आहे.

यामध्ये ३७० मीटर लांबीची अतिरिक्त धक्काभिंत उभारण्यासाठी २६ कोटी ७७ लाख ८८ हजार ६३२ रुपये, तर बंदराच्या प्रवेश मार्गावरील गाळ काढणे आणि रुंदीकरणासाठी २१ कोटी २५ लाख ४७ हजार ८३ रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

याशिवाय बंदरातील काँक्रीटीकरण, लिलाव केंद्र क्रमांक ४, प्रशासकीय भवन, रेडिओ भवन, उपहारगृह, सुरक्षा कक्ष, कंपाउंड वॉल, सांडपाणी प्रक्रिया केंद्र, बर्फ कारखाना, १०० टन क्षमतेचे कोल्ड स्टोरेज, पाणीपुरवठा, ड्रेनेज, सिव्हरेज व्यवस्था आणि डिझेल पंप आदी विविध कामे करण्यात येणार आहेत. या कामांसाठी ८८ कोटी ७५ लाख ४७ हजार ७३६ रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

या विकासकामांमुळे करंजा बंदरातील गाळाची समस्या दूर होण्यासोबतच मच्छीमारांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील हजारो मच्छीमारांना याचा लाभ होणार आहे. मत्स्यव्यवसाय विभागाचे सहआयुक्त महेश देवरे यांनी करंजा मच्छीमार बंदरातील विविध २१ कामांच्या खर्चाच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्याची माहिती दिली.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment