रत्नागिरी : रत्नागिरीतील ज्येष्ठ पत्रकार, कोकण बँकेचे संचालक आणि मनमिळाऊ व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित असलेले जावेद मुजावर यांचे वयाच्या ६६ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या जाण्याने पत्रकारिता, सहकार आणि सामाजिक क्षेत्रात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली असून, सर्वच स्तरांतून हळहळ व्यक्त होत आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून ते कोकण बँकेचे संचालक म्हणून सक्रिय कार्यरत होते. याशिवाय, त्यांनी एस.टी. महामंडळाच्या सेवेतून निवृत्ती पत्करली होती. पत्रकार म्हणून दीर्घकाळ प्रभावी कामगिरी बजावताना त्यांनी साप्ताहिकाचे संपादक आणि प्रकाशक म्हणूनही जबाबदारी सांभाळली होती.
आपल्या शांत, प्रेमळ आणि दिलदार स्वभावामुळे त्यांनी समाजात सर्वच स्तरांत जिव्हाळ्याचे संबंध निर्माण केले होते. त्यांच्या निधनाने रत्नागिरीतील एक अभ्यासू आणि निष्ठावंत पत्रकार हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
