रत्नागिरी शहरात आठवडाबाजार रोड ते काँग्रेस भुवन मार्गावर उद्या सर्व वाहनांना प्रवेश बंदी!

Team RatnagiriLive
1 Min Read

रत्नागिरी, दि. ६ : येथील प्रमोद महाजन क्रीडा संकुलात श्री सदगुरु अनिरुध्द उपासना फाऊंडेशन मुंबईच्यावतीने श्री सदगुरु अनिरुध्द बापू यांच्यावरील अनुभव कथन व भक्ती संगिताचा सत्संग कार्यक्रम घेण्यात येणार आहे.

या सत्संग कार्यक्रमाकरिता संपूर्ण जिल्हाभरातून 10 ते 12 हजार भक्तगणांचा जनसमुदाय एकत्र येण्याची शक्यता आहे. सत्संग कार्यक्रमादरम्यान भक्तगणांची व त्यांच्या वाहनांची परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. अशावेळी पार्किंगचा प्रश्न निर्माण होवू शकतो अगर वाहतूक कोंडी होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. वाहतुकीची कोंडी टाळण्याकरिता व कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी 7 जानेवारी रोजी आठवडा बाजार नाका ते काँग्रेस भुवन दरम्यान सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात यावा आणि वाहतुकीची कोंडी व कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता योग्य नियोजन करण्यात यावे, असे आदेश जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी जारी केले आहेत.

या दिवशी पर्यायी मार्ग म्हणून काँग्रेस भुवन – मुरलीधर मंदिर भुते नाका मार्ग आठवडा बाजार या मार्गाचा वापर करावा. वाहतूक नियमनाबाबत जनतेस माहिती मिळावी यादृष्टीने मोटार वाहन अधिनियम 1988 कलम 116 प्रमाणे वाहतुकीची चिन्हे उभारण्याची कार्यवाही पोलीस विभागाने करावयाची आहे, असेही आदेशात नमूद आहे.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment