बोर्ड परीक्षा खासगी विद्यार्थी नोंदणी ऑगस्ट अखेरपर्यंत

Team RatnagiriLive
3 Min Read
  • एका शाळेला ५० ची कमाल मर्यादा
  • विभागीय अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांची माहिती.

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी- मार्च २०२६ मध्ये होणाऱ्या दहावी बारावी परीक्षांसाठी खासगी विद्यार्थी (फॉर्म नं.१७) योजनेअंतर्गत १ ऑगस्टपासून ऑनलाइन नावनोंदणी सुरू केली आहे. शिक्षण अर्धवट राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी या महत्वपूर्ण योजनेत चालू वर्षी ३१ ऑगस्ट अखेरपर्यंत प्रत्येक शाळेत ५० विद्यार्थी संख्येच्या मर्यादेत नोंदणी करता येणार आहे, अशी माहिती कोकण विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली.

विभागीय अध्यक्ष क्षीरसागर यांनी सांगितले की, ही योजना नियमित शिक्षणापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची दारे उघडणारी आहे. फेब्रुवारी-मार्च २०२६ च्या परीक्षांसाठी नोंदणी १ ऑगस्ट २०२५ पासून सुरू झाली असून, नोंदणीची अंतिम तारीख ३१ ऑगस्ट २०२५ आहे. या योजनेमुळे आर्थिक अडचणी, कौटुंबिक जबाबदाऱ्या किंवा इतर कारणांमुळे शिक्षण सोडलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा मुख्य प्रवाहात येण्याची संधी मिळणार आहे. नाव नोंदणीनंतर पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरता येणार आहेत.

पात्रता निकष- दहावी (SSC) साठी: विद्यार्थ्याने किमान ५वी उत्तीर्ण केलेली असावी आणि ३१ जुलै २०२५ रोजी वय १४ वर्षे पूर्ण असावे. परराज्यातील किंवा परदेशातील विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र राज्यातील दोन वर्षांचे रहिवासी प्रमाणपत्र आवश्यक आहे.
बारावी (HSC) साठी: दहावी परीक्षा किमान दोन वर्षांपूर्वी (उदा., जुलै २०२४) उत्तीर्ण असावी. विज्ञान शाखेसाठी दहावीत विज्ञान विषयात किमान ३५% गुण आणि इंग्रजी विषय अनिवार्य आहे. परराज्यातील विद्यार्थ्यांसाठी योग्यता प्रमाणपत्र बंधनकारक आहे. कोणत्याही मान्यताप्राप्त शाळेत किंवा कनिष्ठ महाविद्यालयात विद्यमान विद्यार्थी नसावा.(सध्या नियमित विद्यार्थी म्हणून शिकत नसावा.)

नोंदणी प्रक्रिया: नोंदणीसाठी अर्ज http://www.mahahsscboard.in संकेतस्थळावर Student Corner या टॅबमध्ये Form No.17 या विभागात उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांनी अर्ज डाउनलोड करून आवश्यक तपशील भरावेत आणि संबंधित कागदपत्रांसह शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयात जमा करावेत. आवश्यक कागदपत्रांमध्ये शाळा सोडल्याचा दाखला, आधार कार्ड, दहावीची गुणपत्रिका (बारावीसाठी), पासपोर्ट आकाराचा फोटो, आणि हमीपत्र (प्रपत्र क्र. १, २, अ, ब) यांचा समावेश आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांनी वैद्यकीय प्रमाणपत्र किंवा UDID कार्ड सादर करावे. नोंदणी शुल्क ₹१,११० आणि प्रक्रिया शुल्क ₹१०० आहे.

महत्वाच्या सूचना: केवळ सामान्य शिक्षण गटाचे विषय निवडता येतात. तांत्रिक किंवा व्यावसायिक अभ्यासक्रम उपलब्ध नाहीत. खाजगी विद्यार्थ्यांना तोंडी, प्रात्यक्षिक आणि प्रकल्प सादर करावे लागतील. विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांनी प्रयोगशाळा सुविधा असलेले मान्यताप्राप्त महाविद्यालय निवडावे. अर्ज सादर केल्यानंतर त्यात बदल करता येणार नाहीत, त्यामुळे अर्ज भरण्यापूर्वी सर्व तपशील काळजीपूर्वक तपासावेत.

ही योजना विद्यार्थ्यांना त्यांचे शैक्षणिक ध्येय साध्य करण्याची संधी देते. ३१ ऑगस्ट २०२५ पर्यंत नोंदणी पूर्ण करा, असे आवाहन राजेश क्षीरसागर यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी http://www.mahahsscboard.in ला भेट द्यावी.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment