युनायटेड गुरुकुलची अनुश्री गौरव भागवत माखजन येथील जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रथम

Team RatnagiriLive
2 Min Read

चिपळूण : माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ माखजन च्या कै.पांडुरंग सीताराम लघाटे संगीत कक्षा मार्फत आयोजित जिल्हास्तरीय आंतरशालेय सुगम संगीत स्पर्धेची अंतीम फेरी रविवार दि.०१ फेब्रुवारी २०२६ रोजी माखजन प्रशालेच्या गुरुदक्षिणा सभागृहात संपन्न झाली.

प्राथमिक निवड फेरीत ध्वनीचित्रफितीच्या माध्यमातून ५० हून जास्त स्पर्धक सहभागी असणाऱ्या या स्पर्धेच्या अंतिम फेरीत अनुश्री सोबतच लहान आणि मोठ्या गटात मिळून आणखी १५ मुलांची निवड झाली होती.

पाचवी ते आठवी अशा लहान गटातील स्पर्धेतून परशुराम एज्युकेशन सोसायटी चिपळूण संचालित युनायटेड इंग्लिश स्कूलच्या गुरुकुल विभागात इयत्ता सातवी च्या वर्गात शिकणाऱ्या कु.अनुश्री गौरव भागवत हिने या स्पर्धेत अनुक्रमे स्वतःच्या पसंतीचे भावगीत ‘ये जवळी घे जवळी प्रिय सखाया भगवंता’ आणि परीक्षकांच्या पसंतीचे ‘बोलावा विठ्ठल’ हे भक्ती गीत स्पर्धेसाठी सादर केले. सर्वच स्पर्धकांच्या उत्तम सादरीकरणाच्या पार्श्वभूमीवर कठीण गाणे सहजतेने आणि सुरेल सादर करणाऱ्या कु.अनुश्रीच्या सादरीकरणाची परीक्षकांनी प्रथम पसंतीचे सादरीकरण म्हणून निवड केली.

प्रशस्तीपत्रक रोख पारितोषिक आणि स्मृतिचिन्ह असे लहान गटाच्या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचे पारितोषिक अनुश्रीला श्री.उदय गोखले यांच्या हस्ते देण्यात आले.

रत्नागिरीतील संगीत क्षेत्रातील दिग्गज श्री.आनंदजी पाटणकर आणि प्रसिद्ध व्हायोलिन वादक श्री उदय गोखले यांनी स्पर्धेचे परीक्षण केले . तसेच प्रसिद्ध हार्मोनियम वादक श्री.चैतन्य पटवर्धन,तबलावादक प्रथमेश शहाणे आणि सुरज पाटणकर यांनी सर्व स्पर्धकांना उत्तम प्रकारे साथ संगत केली.

अनुश्रीच्या पालकांनी अनुश्रीच्या या यशाचे श्रेय तिला शास्त्रीय संगीताचे मार्गदर्शन करणाऱ्या चिपळूण मधील संगीत शिक्षिका सौ.वीणा कुंटे यांना तसेच प.ए.सोसायटी गुरुकुल विभागाच्या कै.आप्पासाहेब दांडेकर संगीत कक्षाच्या माध्यमातून नियमित सराव घेणाऱ्या संगीत शिक्षकांना दिले.

युनायटेड प्रशालेचे नवनियुक्त मुख्याध्यापक श्री.संजय बनसोडे सर यांनी कु.अनुश्रीचे तिच्या पालकांचे आणि गुरुकुल विभागाचे अभिनंदन केले.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment