- कोट्यवधींच्या कामाच्या दर्जावर प्रवाशांचे प्रश्नचिन्ह!
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरील महत्त्वाचे स्थानक असलेल्या रत्नागिरी रेल्वे स्टेशनच्या सुशोभीकरणाचा फज्जा उडाला आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या प्रवेशद्वारावरील छत रविवारी झालेल्या वादळी पावसात दुसऱ्यांदा कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे रेल्वे प्रशासनासह संबंधित कंत्राटदार कंपनी आणि यंत्रणांच्या कामाच्या दर्जाबाबत प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

आधीही कोसळले होते छत; दुरुस्तीनंतर पुन्हा तीच गत
मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरी रेल्वे स्थानकाच्या सुशोभीकरणाचे काम महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) आणि राज्याचा सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) यांच्या माध्यमातून ‘न्याती’ कंपनीकडून करण्यात आले होते. धक्कादायक बाब म्हणजे, हे काम पूर्ण होत आले असतानाच गेल्या वर्षीच्या पावसातही हे छत कोसळले होते. त्यावेळी संबंधित कंपनीने याची तात्पुरती दुरुस्ती केली होती. मात्र, रविवारी झालेल्या पहिल्याच जोरदार वादळी पावसात हे छत पुन्हा एकदा कोसळले.
स्थानिक वातावरण आणि भौगोलिक स्थितीचा विसर?
या कामाला अजून दोन वर्षेही पूर्ण झालेली नसताना कोट्यवधी रुपयांचा निधी पाण्यात गेल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे. कोकणातील हवामान, पावसाचा जोर आणि वादळी वाऱ्यांची दिशा या अत्यंत महत्त्वाच्या भौगोलिक बाबींचा कोणताही विचार न करता केवळ घाईगडबडीत हे काम उरकण्यात आल्याचा गंभीर आरोप आता प्रवाशांकडून केला जात आहे.
प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
सुदैवाने हे छत कोसळले तेव्हा स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारावर मोठी गर्दी नव्हती, अन्यथा मोठी दुर्घटना घडू शकली असती. मात्र, कोकण रेल्वेच्या इतक्या महत्त्वाच्या स्टेशनवर असा प्रकार वारंवार घडत असल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
प्रवाशांची मागणी: “कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करूनही जर पहिल्याच पावसात छत टिकत नसेल, तर या सुशोभीकरणाचा काय फायदा? या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांवर कडक कारवाई झाली पाहिजे.”
