महिनाभरात पैसे दुप्पट करण्याचे आमिष; पनवेलमध्ये ७२.९८ लाखांचा कथित गंडा

Team RatnagiriLive
3 Min Read
उरणमधील चार गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याची तक्रार; ३२ वर्षीय महिलेविरोधात गुन्हा दाखल
उरण दि ६ (विठ्ठल ममताबादे ) : अल्पावधीत गुंतवणुकीची रक्कम दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवून चार गुंतवणूकदारांची तब्बल ७२ लाख ९८ हजार रुपयांची कथित फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार पनवेलमध्ये उघडकीस आला आहे. या प्रकरणात उरण तालुक्यातील जेएनपीटी टाऊनशिप, पिरकोन आणि करंजा परिसरातील रहिवाशांनी तक्रार दाखल केली असून, कोप्रोली येथे राहणाऱ्या ३२ वर्षीय महिलेविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिनाभरात रक्कम दुप्पट होण्याच्या आशेने गुंतवणूक केलेल्या नागरिकांना अखेर आर्थिक फटका बसल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांत दाखल तक्रारीनुसार, संबंधित महिलेने पनवेल येथील ओरियन मॉलमध्ये पहिल्या गुंतवणूकदाराची भेट घेऊन अवघ्या महिनाभरात गुंतवलेली रक्कम दुप्पट करून देण्याचे आश्वासन दिले होते. विशेष म्हणजे, गुंतवलेली मूळ रक्कमही सुरक्षित राहील, असा विश्वास तिने दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. या आश्वासनावर विश्वास ठेवून उरण तालुक्यातील कोंढरीपाडा (करंजा) येथील ३१ वर्षीय व्यक्तीने ८ सप्टेंबर रोजी चार लाख रुपये, तर ९ सप्टेंबर रोजी आणखी ९८ हजार रुपये गुंतवले. त्यानंतर आणखी तीन व्यक्तींनीही या योजनेत लाखो रुपयांची गुंतवणूक केली. अशा प्रकारे चार गुंतवणूकदारांकडून एकूण ७२ लाख ९८ हजार रुपये स्वीकारण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
महिन्याची मुदत संपूनही ठरल्याप्रमाणे दुप्पट रक्कम मिळाली नाही. त्यामुळे गुंतवणूकदारांनी मूळ रक्कम परत मिळवण्यासाठी संबंधित महिलेकडे पाठपुरावा सुरू केला. मात्र, वारंवार मागणी करूनही पैसे परत मिळत नसल्याने गुंतवणूकदारांना आपली फसवणूक झाल्याचा संशय आला. अखेर त्यांनी पनवेल शहर पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली.
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन नवी मुंबई पोलीस दलाच्या आर्थिक गुप्तवार्ता कक्षामार्फत प्राथमिक चौकशी करण्यात आली. पोलीस उपायुक्त (गुन्हे) सचिन गुंजाळ यांच्या पथकाने केलेल्या चौकशीनंतर संबंधित महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
उरणमध्ये पुन्हा दामदुप्पट आमिषाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.उरण परिसरात यापूर्वीही दामदुप्पट योजनेच्या आमिषाने स्थानिक नागरिक आणि प्रकल्पग्रस्तांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याच्या घटना समोर आल्या होत्या. या प्रकरणांमुळे अनेक नागरिक आर्थिक संकटात सापडले होते. न्यायासाठी मोर्चे आणि आंदोलनेही करण्यात आली होती. त्यानंतरही अशा प्रकारच्या गुंतवणूक योजनांचे आमिष दाखवून नागरिकांची फसवणूक होत असल्याचा आरोप समोर आल्याने पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
अशा आर्थिक फसवणुकीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी स्थानिक पोलीस आणि आर्थिक गुप्तवार्ता कक्षाला गोपनीय माहिती संकलित करून संशयास्पद गुंतवणूक योजनांवर लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या.
अवास्तव परताव्याच्या आमिषाला बळी पडू नका!असे पोलीस प्रशासनातर्फे आवाहन करण्यात आले असून महिनाभरात पैसे दुप्पट, अल्पावधीत मोठा नफा किंवा मूळ रक्कम सुरक्षित राहण्याची हमी अशा आकर्षक आश्वासनांमागे आर्थिक फसवणुकीचा धोका असू शकतो. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अनधिकृत गुंतवणूक योजनेत पैसे गुंतवण्यापूर्वी संबंधित व्यक्ती, संस्था आणि योजनेची कायदेशीर वैधता तपासावी. मेहनतीने कमावलेली पुंजी केवळ अवास्तव परताव्याच्या आमिषापोटी धोक्यात घालू नये, हाच या घटनेतून पुन्हा एकदा मिळणारा महत्त्वाचा इशारा आहे.उरण पनवेल परिसरात आर्थिक फसवणूकीच्या घटना वारंवार घडत असल्यामुळे आर्थिक सुरक्षिततेचा प्रश्न एरणीवर आला आहे.आर्थिक गुन्ह्यांना लगाम घालण्यासाठी विविध उपाययोजनांची गरज निर्माण झाली आहे.

Loading

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment