सलग तीस वर्षे एखादी संस्था यशस्वीपणे चालवणे अभिनंदनीय : उद्योजक विष्णू रामाणे
- नानासाहेब शेट्ये यांचा ३० वा स्मृतिदिन
- पुरस्कार आणि बक्षिस वितरण
साखरपा (प्रतिनिधी ) : कै . नानासाहेब शेट्ये यांनी सामाजिक , शैक्षणिक , क्रिडा अशा विविध क्षेत्रात केलेले काम दीपस्तंभासारखे आहे. त्यांनी केलेल्या कार्याला पुढे नेण्याचे काम संदेश शेट्ये आणि त्यांचे सहकारी सलग ३० वर्षे यशस्वीपणे करत आहेत, हे अभिनंदनीय तसेच कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन मुंबईस्थित उद्योजक विष्णू रामाणे यांनी केले .
कै. नानासाहेब शेट्ये यांचा ३० वा . स्मृतिदिन आणि पुरस्कार वितरण समारंभ आज १ ऑगस्ट रोजी ‘ नाना शेट्ये सभागृह ‘ साखरपा येथे संपन्न झाला . यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक रामाणे हे बोलत होते. व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष दत्ताराम शिंदे , उद्योगपती रामकृष्ण कोळवणकर , प्रा.आबासाहेब सावंत, कै.नानासाहेब शेट्ये स्मारक समितीचे अध्यक्ष बापूसाहेब शेट्ये, व्यक्ती पुरस्कार प्राप्त जितेंद्र पराडकर , संस्था पुरस्कार प्राप्त संस्था अध्यक्ष वि.ल.मयेकर , प्राचार्य डॉ. विश्वास पाटील , रमाकांत शेट्ये , उपसरपंच कोलते , कांबळे सर, प्राथमिक शाळा मुख्याध्यापक अभिमन्यू शिंदे , घावरे सर , चिटणीस रमाकांत शिंदे , खजिनदार मारुती शिंदे , कार्याध्यक्ष गणपत शिर्के आणि सर्व सदस्य उपस्थित होते . प्रारंभी दिवंगतांना श्रध्दांजली वाहण्यात आली . दीप प्रज्वल करुन कै . नानासाहेब शेट्ये आणि लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले . उपस्थित मान्यवरांचा अध्यक्ष संदेश शेट्ये यांच्या हस्ते शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला .
साखरपा पंचक्रोशीतील दहावी – बारावी परीक्षेत गुणवत्ता प्राप्त आणि शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र , रोख पारितोषिक आणि गुलाबपुष्प देवून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला . सर्व बक्षिसप्राप्त विद्यार्थ्यांच्या बक्षिसांची रक्कम कार्याध्यक्ष गणपत शिर्के यांनी व्यक्तिगतरित्या दिली होती . व्यक्ति आणि संस्था पुरस्कारासाठी देण्यात आलेल्या मानपत्राचे वाचन गणपत शिर्के यांनी केले . या मानपत्राचे अप्रतिम असे लेखनही गणपत शिर्के यांनीच केले होते .
व्यक्ती पुरस्कार पैसा फंडचे कलाशिक्षक आणि लेखक जितेंद्र पराडकर यांना उद्योजक विष्णू रामाणे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला . व्यक्ति आणि संस्था पुरस्काराचे स्वरुप मानपत्र , सन्मानचिन्ह ,शाल श्रीफळ , पुष्पगुच्छ आणि रोख २५०० असे आहे . यावेळी सन्मानानंतर आपले मनोगत व्यक्त करताना जितेंद्र पराडकर म्हणाले की , कै . नानासाहेब शेट्ये यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार माझ्यासाठी अत्यंत प्रेरणादायी आहे . आपले काम कसे करावे आणि कामाप्रती कशी निष्ठा असावी , याची शिकवण देणारा हा पुरस्कार असून हा पुरस्कार देवून आपल्याला सन्मानित केल्याबद्दल आपण स्मारक समितीचे ऋणी असल्याचे नमूद केले . याबरोबरच आपल्या लेखनकार्यासह कलाक्षेत्रातील योगदानाचा पराडकर यांनी थोडक्यात आढावा घेतला .
संस्था पुरस्कार हर्चे ता . लांजा येथील सत्येश्वर शिक्षण संस्थाध्यक्ष वि . ल . मयेकर , सर्व संस्था पदाधिकारी , मुख्याध्यापक जे . एम . पाटील , आनंदराव जाधव , विलास पाटील प्रशालेचा कर्मचारी वर्ग यांनी स्मारक समिती अध्यक्ष बापूसाहेब शेट्ये यांच्या हस्ते स्वीकारला . मानपत्र , सन्मानचिन्ह , शालश्रीफळ , पुष्पगुच्छ , रोख २५०० /- रुपये असे या पुरस्काराचे स्वरुप आहे . सत्येश्वर शिक्षण संस्थेच्या वतीने अध्यक्ष वि . ल . मयेकर आपल्या मनोगतात म्हणाले की , समाजवाद हा शब्द जड सध्या सर्वांनाच वाटतो यासाठी विवेक आत्मसात करायला हवा . विद्यार्थ्यांनी भावी वाटचालीसाठी विवेकाचा वापर करावा असे सांगून नानासाहेब शेट्येंच्या कार्याचा आढावा घेत समितीच्या कार्याचे कौतूक केले . सत्येश्वर शिक्षण संस्थेला पुरस्कार देवून गौरविल्याबद्दल स्मारक समितीला धन्यवाद दिले .
याच कार्यक्रमात स्मारक समिती अध्यक्ष बापूसाहेब शेट्ये यांची जिल्हा नियोजन मंडळावर सदस्य म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल स्मारक समितीच्या वतीने प्रमुख पाहुणे विष्णू रामाणे आणि शेट्ये कुटुंबीयांच्या वतीने रमाकांत शेट्ये यांच्या हस्ते शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देवून सन्मान करण्यात आला . यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना बापूसाहेब म्हणाले की , स्मारक समितीचे काम करत असताना सर्वांचे सहकार्य मिळत आहे म्हणून हे शक्य होतेय . गेली ३० वर्षे स्मारक समिती विद्यार्थी गुणगौरव करत आहे मात्र विद्यार्थ्यांच्या पालकांनी देखील अशा कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहीले पाहिजे . संस्था आणि व्यक्ति पुरस्कार निवडताना समिती खूप कस लावते आणि निवड करते असे स्पष्ट करुन आजवर असंख्य विद्यार्थी , संस्था आणि व्यक्ति यांचा स्मारक समितीला गौरव करता आला याचा समितीला आनंद आहे . आजच्या कार्यक्रमाला आपल्या व्यस्त दिनक्रमातून प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक विष्णू रामाणे आणि कोळवणकर हे उपस्थित राहीले याबद्दल त्यांना शेट्ये यांनी धन्यवाद दिले . यावेळी उद्योजक कोळवणकर , रमाकांत शेट्ये , आबासाहेब सावंत , कांबळे सर यांनीही आपली मनोगतं व्यक्त करुन कै . नानासाहेब शेट्ये यांच्या कार्याचा आढावा घेऊन स्मारक समितीच्या कार्याचे कौतूक केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्याध्यक्ष गणपत शिर्के यांनी तर आभार प्रदर्शन रमाकांत शिंदे यांनी केले . कार्यक्रमाला साखरपा पंचक्रोशीतील ग्रामस्थ, मान्यवर आणि विद्यार्थी उपस्थित होते.