रत्नागिरी : “मत्स्य शिक्षणावर चर्चा: मच्छिमारांनी मत्स्य शिक्षण सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन”
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत येणाऱ्या रत्नागिरी येथील मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगांव येथे ७ मे रोजी दापोलीतील १६ पत्रकार आणि माध्यम प्रतिनिधींनी विशेष प्रक्षेत्र भेट दिली.
दक्षिण कोकण किनारपट्टीवरील मत्स्यव्यवसाय आणि संशोधन कार्याची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने या दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. के. जे. चौधरी यांनी सर्व पत्रकारांचे स्वागत केले. त्यांनी उपस्थित प्रसारमाध्यम प्रतिनिधींना मार्गदर्शन करताना मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन महाविद्यालायची माहिती दिली. मत्स्यकी शिक्षण संधी मध्ये दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर अकरावी/बारावी न करता थेटपणे व्यावसायिक शिक्षण घेतल्यास मत्स्य व्यवसाय आणि मत्स्य शेती मध्ये रोजगार आणि स्वयंरोजगार संधी उपलब्ध असून त्यांचा जास्तीत-जास्त फायदा मिळवून देण्यासाठी महाविद्यालय करत असलेल्या उपक्रमांची माहिती त्यांनी दिली.
यावेळी पत्रकारांनी या शासकीय तंत्रनिकेतन च्या विविध प्रयोगशाळा, खेकडा संवर्धन यूनिट आणि ॲक्वापोनिक्स यूनिटला भेट देऊन माहिती घेतली.
विद्यापीठाचे डॉ. एस. डी. देसाई यांनी या दौऱ्याचे नियोजन केले. या भेटीमुळे विद्यापीठाचे संशोधन आणि तंत्रज्ञान सामान्य मच्छिमार व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे. या दौऱ्याबद्दल पत्रकारांनी समाधान व्यक्त केले असून, कृषि आणि मत्स्य क्षेत्रातील नवनवीन प्रयोग समाजासमोर आणण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे मत व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राजेश ठोकळ, शिक्षण संचालक डॉ सतीश नारखेडे आणि संशोधन संचालक डॉ. प्रशांत शहारे यांचे मार्गदर्शन लाभले.
