महाविकास आघाडीतील सर्वांनी मिळून कोकण पदवीधर मतदारसंघातून रमेश कीर यांना विजयी करुया : नसीम खान

Team RatnagiriLive
2 Min Read
  • टिळक भवनमध्ये कोकण विभागातील पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न

मुंबई, दि. १५ जून २०२४ : विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश कीर यांना विजयी करण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी जोमाने काम करावे. मतदारांशी संपर्क व संवाद साधा, महाविकास आघाडीतील प्रत्येक घटकाशी योग्य समन्वय साधून काम करा, महाविकास आघाडीचा विजय नक्की आहे, असा विश्वास प्रदेश काग्रेसचे कार्याध्यक्ष व कोकण पदवीधर मतदार संघाच्या समन्वय समितीचे अध्यक्ष नसीम खान यांनी व्यक्त केला आहे.

प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन, दादर येथे कोकण विभागातील संघटानात्मक १३ जिल्ह्यांचे अध्यक्ष, पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते यांची बैठक प्रदेश कार्याध्यक्ष व कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या समन्वय समितीचे प्रमुख नसीम खान यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

या बैठकीत ते मार्गदर्शन करत होते. ते पुढे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत जनतेने महाविकास आघाडीला कौल दिला आहे. जनता भारतीय जनता पक्षाच्या विभाजनकारी व जनविरोधी राजकारणाला कंटाळली आहे. लोकसभेप्रमाणे विधान परिषदेच्या निवडणुकीतही महाविकास आघाडीचाच विजय होईल त्यासाठी मतादारांशी थेट संपर्क साधा, त्यांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी प्रयत्न करा. महाविकास आघाडीतील मित्रपक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, समाजवादी पार्टी, शेकाप, आम आदमी पक्षासह सर्व समविचारी पक्षांशी योग्य समन्वय साधून काम केल्यास आपल्याला विजयापासून कोणीही रोखू शकणार नाही असे नसीम खान म्हणाले.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment